सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. पण, भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. आता दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिजचे (डिक्की) प्रमुख पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे नाव चर्चेत आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचे कांबळे यांनी सांगितले. पण काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच भाजपकडून सोलापूरसाठी कोण? हे अंतिम होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
भाजपने माढ्यासह राज्यातील काही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी नाराजीचा सामना पक्षाला करावा लागत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली. पण, त्याठिकाणी मोहिते-पाटील यांची नाराजी कायम आहे.
हा अनुभव पाहता भाजपने सोलापूरच्या बाबतीत सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान, सोलापूर महापालिकेचे माजी नगरसेवक संगीता जाधव, प्रा. नारायण बनसोडे यांच्यापासून माळशिरसचे आमदार राम सातपुते, माजी खासदार ॲड. शरद बनसोडे, प्रशासकीय अधिकारी भारत वाघमारे, उद्योजक राम रेड्डी यांच्याही नावाची चर्चा सोशल मीडियावर झाली.
पण, आता मूळचे उदगीर (लातूर) येथील पद्मश्री मिलिंद कांबळे यांनाच उमेदवारी मिळू शकते, असे बोलले जात आहे. श्री. कांबळे यांनीही त्यासंदर्भात पक्षातील वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याचे माध्यमांसमोर बोलताना सांगितले. आता भाजपचा सोलापूर लोकसभेचा उमेदवार कोण, हे आगामी काही दिवसांत जाहीर होईल. त्यावेळी नेमका उमेदवार कोण हे स्पष्ट होणार आहे.