भारतीय जनता पार्टी कडून सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवार माजी खासदार अमर साबळे हे मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे तथा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रत्येक वक्तव्याचा समाचार घेताना दिसत आहेत. ते सध्या दिल्लीमध्ये असून त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया या दिल्लीतून आल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान आता अमर साबळे यांच्या टिकांवर सोलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. “अमर साबळे तुम्ही दिल्लीत काय बोलता, गल्लीत येऊन बोला. सोलापूरचे प्रश्न समजून घ्या, मागील दहा वर्षापासून आपण भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहात परंतु आपल्याला उमेदवारी मिळत नाही. मागील दहा वर्षात आपल्या खासदारांनी किती विकास केला आहे, सोलापूरकर जाणून आहेत.
आपल्या खासदाराला साधे सोलापुरात ऑफिस करता आले नाही आणि विकासाचे काय बोलता? जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्या निष्ठावंतांना भाजपने उमेदवारी दिली नाही, यंदा सोलापूरला कोणताही परका उमेदवार चालणार नाही. सर्वांच्या हक्काची ताई प्रणिती शिंदे याच सोलापूरच्या खासदार होणार आणि भाजपला हद्दपार करणार असा सणसणीत टोला नरोटे यांनी साबळे यांना हाणला.