विरोधकांचा अवाज दाबण्यासाठी सरकार अलिकडे ईडी, सीबीआय, आयकर सारख्या एजन्सींचा गैरवापर मोठ्या प्रमाणात करीत आहे. लोकसभा प्रक्रियेत दहशतीचे वातावरण निर्माण करणे हे लाेकशाहीवर आलेले संकट आहे. एका प्रकारे लाेकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरु आहे. यापुर्वी असे कधी घडले नव्हते, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेवर यावेळी पवार यांनी जोरदार टीका केली.
बारामती येथील गाेविंदबाग निवासस्थानी पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी पवार म्हणाले, राज्याच्या प्रमुखाला अटक करण्यापर्यंत भाजप गेले आहे. सध्या चिंतेची अवस्था निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाचे बँकेचे अकाउंट सील केले आहे. त्यांचे अकाउंट गोठवल्यामुळे त्यांच्या प्रचार यंत्रणेने जे नियोजन केलेले होते, ते पूर्ण कोलमडले आहे. छपाई थांबली. लोकांचा प्रवास थांबला. बाकीच्या सुविधा या पद्धतीने त्यांचे खाते गोठवून थांबवलेल्या आहेत. एका दृष्टीने देशातील महत्त्वाच्या पक्षाला आज प्रचार करण्यासाठी साधनसामग्रीही उपलब्ध करून द्यायची नाही अशी टोकाची भूमिका प्रथमच घेतली जात असल्याचे पवार म्हणाले.