पुणे, ता. २२ – धर्म व मूल्यांवर आधारित समता व शोषणमुक्त समाजाचा पाया भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनकार्यातून घालून दिला. देशाच्या एकात्मतेसोबत समता, स्वातंत्र्याची सांगड कशी घातली गेली पाहिजे. याचं मौलिक मार्गदर्शन संविधानाच्या माध्यमातून त्यांनी केलं. आणि अशा महामानवाचं सर्वार्थाने दर्शन घडवणारे हे सुंदर असे राष्ट्रीय स्मारक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बायोसिस विद्यापीठ परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणाभूमी या स्मारकाला भेट दिल्यानंतर छोटेखानी सत्कार समारंभा प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. शां.ब. मुजुमदार, संजीवनी मुजुमदार, डॉ. विद्या येरवडेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह सचिन भोसले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते के. डी. जोशी, काश्यपदादा साळुंखे, किशोर खरात, वेणू साबळे, क्षितिज गायकवाड, संघर्ष गवाले, विजय कांबळे, शरद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देवून डॉ. आंबेडकरांच्या जीवनात त्यांनी उपयोगात आणलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शनास भेट दिली. यावेळी स्मारकाच्या संचालिका संजीवनी मुजुमदार व विद्या येरवडेकर यांनी त्यांना स्मारका संबंधाने विस्ताराने माहिती दिली.
या स्मारकांची वास्तू त्यातील ठेवा मुजुमदार कुटुंबियांनी खूप सुंदर रित्या जपला आणि मांडला आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे. त्यांनी उभारेलले हे स्मारक डॉ. आंबेडकरांच्या असंख्य आठवणींना उजाळा देणारे आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांनी या प्रेरणा भूमिचे दर्शन घेवून त्यातून प्रेरणा घ्यायला हवी असे सरसंघचालक भागवत म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ. मुजुमदार यांनी आपल्या मनोगतातून या स्मारकाच्या उभारणी संबंधातील आठवणी सांगितल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चारित्र्यवान नागरिक घडवते. आपल्या उच्च शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी शिक्षित होतात मात्र सुसंस्कृत होत नाहीत. सुसंस्कृत, चारित्र्यवान विद्यार्थी – नागरिक घडावा यासाठी संघाने उच्च शिक्षण क्षेत्रात काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.