राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय अद्यापही सुटलेला नाही. लोकसभेच्या निवडणुका लागल्यामुळे तर राज्यात मराठा समाज अधिक आक्रमक झाला आहे. त्याचे पडसाद उमेदवार जेव्हा प्रचारासाठी जातात तेव्हा उमटत आहेत. मराठा समाजाच्या रोषाला सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना अनेक ठिकाणी सामोरे जावे लागले आहे.
नुकतेच पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावात प्रचाराला गेलेल्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या गाडीला मराठा समाजाच्या आंदोलकांनी अडवले. त्यावेळी बराच गोंधळ उडाला, प्रणिती शिंदे या आक्रमक भूमिका घेत त्या थेट आंदोलकांना भिडल्या. प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली नसती तर तिथे काहीही होऊ शकले असते.
नंतर प्रणिती शिंदे यांनी मराठा आंदोलनाअडून भाजपनेच हे कृत्य केल्याचा आरोप केला. त्यावर मराठा समाज आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधून प्रणिती शिंदे यांनी माफी मागावी अशा मागणीने जोर धरला आहे. दरम्यान मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अशा घटनेचे समर्थन करणार नाही असे वक्तव्य केल्याने काँग्रेस पक्षाने त्याचे स्वागत केले आहे.
मराठा समाजाची आक्रमकता अजूनही वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर सरकोली येथील घटनेनंतर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तूरे यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करणार असल्याचे सांगितले आहे.
मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप अपयशी ठरले आहे. मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत, पण मराठा समाज बांधव कायम काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. त्यांच्या आरक्षण मागणीला आमचा विरोध नाही. अशा घटना यापुढेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मराठा आरक्षणाच्या अडून मराठा समाजाला बदनाम करण्याच्या दृष्टीने काही अज्ञात शक्ती गर्दीच्या अडून गैरफायदा घेऊ शकते. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताईंना यापुढे पोलीस बंदोबस्त द्यावा असे हत्तूरे म्हणाले.