सोलापूर वकील संघाच्या कार्यकारिणी समितीच्या सभेत ठरल्याप्रमाणे बार असोसिएशनच्या निवडणुकीचाही निर्णय झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विद्यमान अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. २०२४-२५ या वर्षीची निवडणूक २९ एप्रिल रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्यास ३ एप्रिलपासून सुरवात होणार आहे.
सोलापूर बार असोसिएशनच्या सदस्यांना २२ ते २४ मार्चपर्यंत वर्गणी भरण्यासाठी मुदत आहे. निवडणुकीची प्रारूप मतदार यादी २६ मार्चला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर हरकती विचारात घेऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. ३ ते १५ एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करणे, २९ एप्रिलला मतदान आणि त्याच दिवशी निकाल, असा निवडणुकीचा कार्यक्रम असणार आहे. निकालाच्या दुसऱ्या दिवशी ३० एप्रिलला विशेष सर्वसाधारण सभा बोलावून त्यावेळी नवोदित पदाधिकाऱ्यांकडे बार असोसिएशनचा पदभार सुपूर्द केला जाणार आहे. जास्तीत जास्त विधीज्ञांनी वार्षिक वर्गणी भरून सभासदत्व जीवित ठेवावे, असे आवाहन विद्यमान अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. गायकवाड यांनी केले आहे.