दिल्लीच्या नरेला येथील बुधपूर भागात आज, सोमवारी पहाटे एका गोदामाला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केलं. आजूबाजूच्या इतर गोदामांनाही आगीनं आपल्या भक्ष्यस्थानी घेतले. आगीचे रौद्ररुप पाहून आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
आगीच्या ज्वाळा प्रचंड होत्या. काही वेळातच संपूर्ण परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल 34 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरूच आहे. याबाबत अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन नियंत्रण कक्षाला सकाळी 6.30 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. एकामागून एक अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचू लागल्या असून आतापर्यंत 34 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांची संख्या 135 हून अधिक आहे. घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी वीरेंद्र सिंह, उपमुख्य अग्निशमन अधिकारी एस के दुआ, विभागीय अधिकारी राजेंद्र अटवाल, मनोज शर्मा यांच्यासह 125 हून अधिक अग्निशमन कर्मचारी आगिवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.