रायगड जिल्हयातील अलिबाग येथील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी येथे दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या त्या तीन वेळा आमदार होत्या. १९९९ मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. शेकापचे आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत. एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती.
रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते. शेकापचे आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक प्रकट केला जात आहे. एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती. शेकापतर्फे रायगडमध्ये अनेक आंदोलने करण्यात आली. त्या प्रत्येक आंदोलनात मीनाक्षी पाटील नेहमीच आघाडीवर राहिल्या. शेकापतर्फे आरसीएफ, रेवस मांडवा विमानतळ, महासेझ,आयपीएल आदी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा मीनाक्षी पाटील यांनी प्रयत्न केला.
१९९२ मध्ये मीनाक्षी ताई या रायगड जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्या म्हणून काम पाहिले. १९९५ मध्ये आलेल्या विधानसभा निवडणुकीत मीनाक्षी पाटील या अलिबाग, उरण मतदार संघातून शेकापतर्फे पहिल्या महिला आमदार म्हणून विजयी झाल्या. विधिमंडळात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका स्वीकारत त्यांनी आपला बाणा दाखवून दिला. त्यावेळी राज्यात प्रथमच शिवसेना, भाजप यांचे युती सरकार सत्तेवर आले होते तर काँग्रेस विरोधी पक्षात बसली होती. त्यावेळी मीनाक्षी पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करून मतदार संघातील अनेक प्रश्न तडीस लावले. विरोधात राहूनही सत्ताधारी पक्ष समवेत चांगले संबंध निर्माण करीत विकास निधी आणण्यात त्या यशस्वी झाल्या.
आघाडी सरकारात शेकाप सहभागी झाली होता. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, मोहन पाटील, मीनाक्षी पाटील यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मंत्री म्हणून काम करताना मीनाक्षी पाटील यांनी कोकणातील बंदरे विकासासाठी विशेष प्रयत्न केले. सरकारी निधी मोठ्या प्रमाणात आणण्यात त्या यशस्वी झाल्या.
२००४ मध्ये तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या मीनाक्षी पाटील यांना काँग्रेसच्या मधूकर ठाकूर यांनी पराभूत केले. पण यामुळे खचून न जाता पुन्हा उभारी घेत मीनाक्षी पाटील यांनी २००९ मध्ये पुन्हा निवडून येण्याची किमया केली.२००९ ते २०१४ या काळात प्रभावी कामगिरी करीत सत्ताधाऱ्यांवर संसदीय पद्धतीचा अवलंब करून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. आमदारकी शिवाय रायगड जिल्हा पत्रकार संघ, रायगड बाजार आदी संस्थांवर पण त्यांनी काम केले. बिहार सरकारच्या पत्रकार विरोधी बिलाच्या विरोधात जे आंदोलन झाले त्यात मीनाक्षी पाटील यांचा समावेश होता. त्याबद्दल त्यांना तुरुंगवास देखील झाला होता. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.