नेहमीच कोणत्या कोणत्या वादात सापडणारे हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा आणखी एक नवीन कारनामा समोर आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे सद्या मसाई मातेची यात्रा सुरू आहे. विशेष म्हणजे या यात्रेत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं नाही अशी परंपरा आहे. मात्र असे असतांना देखील आमदार बांगर या यात्रेत गेल्याने गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. दरम्यान यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटात झालेल्या बाचाबाचीनंतर कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला.
नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणारे आमदार बांगर आता पुन्हा एका नवीन वादामुळे चर्चेत आले आहेत. त्याचे झाले असे की, हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे सद्या मसाई मातेची यात्रा सुरू आहे. दरवर्षी भरणाऱ्या या यात्रेत मोठ्याप्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे रद्द झालेली यात्रा पूर्ण क्षमतेने भरली नव्हती, त्यामुळे यंदा मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पण याचवेळी या यात्रेची एक वेगळी परंपरा आहे. या यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांना बोलावलं जात नाही. अनेक वर्षांची ही परंपरा पाहता जिल्ह्यातील राजकीय पुढारी देखील या यात्रेला जाण्यासाठी टाळतात.
गावकऱ्यांनी अडवला ताफा…
यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांना न बोलवण्याची परंपरा असतांना देखील आज आमदार बांगर हे या यात्रेला पोहचले. आमदार बांगर येताच गावकऱ्यांनी त्यांचा गाड्यांचा ताफा थांबवला. तर यात्रेला राजकीय स्वरूप नको या अपेक्षेने गावकऱ्यांनी आमदार बांगर यांना रोखले होते. मात्र याचवेळी ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यामुळे दोन्ही गटात राडा सुरु झाला. पाहता पाहता दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरु झाली. मात्र गावकऱ्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. पण याचवेळी आमदार बांगर यांनी यात्रेत येण्याची घेतलेल्या भूमिकेबद्दल देखील गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.