राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाला 2023-24 या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून 166 कोटी 32 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 31 मार्चअखेर विभागाकडून 189 कोटी 60 लाखांचा (114 टक्के) महसूल शासन जमा करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने दिलेले महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. वर्षभरात अवैध दारूविरुद्ध केलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले आहे.
वर्षभरात अवैध दारूविरुद्ध राबविलेल्या मोहिमेत सहा कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसुलाच्या संवर्धनाकरिता अवैध देशी-विदेशी दारू, हातभट्टी दारू, ताडी विक्री, निर्मितीवर सातत्याने कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकूण 2067 गुन्हे दाखल केले असून 1702 आरोपींना अटक केली. मागील वर्षीच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात गुन्ह्यांच्या नोंदीत व मुद्देमालात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राज्यभरात “हातभट्टीमुक्त गाव” अभियान प्रभावीपणे राबविले जात असून त्या अनुषंगाने सोलापूर विभागाकडून 2023-24 मध्ये हातभट्टी निर्मितीचे 668, हातभट्टी दारु विक्रीचे 418 व हातभट्टी दारू वाहतुकीचे 134 गुन्हे नोंदविले आहेत.