महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने १ एप्रिलपासून नवे वीज दर लागू केले आहेत. यामुळे आधीच वाढलेल्या वीजबिलात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सर्वसामान्य ग्राहकांना नव्या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नव्या दरवाढीचा परिणाम घरगुती ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. दर महिन्याला वीज वापरासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग म्हणजेच एमईआरसीने नवे दर लागू केले आहेत. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी हा धक्का मानला जात आहे. त्यांच्या खिशाला आणखी कातरी लागणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सन २०२३ मध्ये इंधन समायोजन आकाराच्या वसुलीला परवानगी आणि वीज दरवाढ केली होती.त्यातच पुन्हा सलग दुसऱ्या वर्षीही दरवाढ केल्याने घरगुती वीज ग्राहकांच्या वीजबिलात दरमहा शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ होणार आहे. आधीच बिघडलेले बजेट यामुळे आणखी कोलमडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भर उन्हाळ्यात वीज बिल वाढविणार ताप
महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना वीज महावितरण कंपनीही अन्याय करीत असल्याची भावना सर्वसामान्यांत आहे. नव्या दरवाढीमुळे करावे तरी काय, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवाय उन्हाळ्यात कूलर, पंखे आदींच्या सर्वाधिक वापरामुळे बिल आणखीच फुगणार आहे.