लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी भाजपने स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर केली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे होती. मात्र शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर भाजपने सुधारित यादी जाहीर करत त्यातून शिंदे – पवार यांची नावे वगळली आहेत.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून स्टार प्रचारकांच्या नावांची नवी यादी दिली आहे. स्टार प्रचारकांच्या सुधारित यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ४० जणांच्या नावांचा समावेश आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, ही यादी निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील समाविष्ट असलेल्या उर्वरित लोकसभा मतदारसंघांसाठी वैध मानली जाऊ शकते, जोपर्यंत आम्ही इतर कोणत्याही सुधारित यादी पाठवत नाही.
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोण?
भाजपने शिंदे आणि पवार यांना आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. त्यानंतर आता भाजपच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी नड्डा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांचा समावेश आहे. दरम्यान आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असतील.
शरद पवार यांच्या गटाकडून भाजपविरोधात आक्षेप घेत निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यात भाजपने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राष्ट्रीय पक्षांना ४० स्टार प्रचारकांना उमेदवारी देण्याची परवानगी आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार स्टार प्रचारक हे निवडणूक लढविणाऱ्या पक्षाचेच सदस्य असायला हवेत, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे वगळण्यात आली आहेत.