आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज, रविवारी दिल्लीतील मुख्यालयात ‘मोदी की गारंटी’ संकल्पपत्राचे लोकार्पण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांसह इतर प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी प्रकाशित केलेल्या संकल्पपत्राची पहिली प्रत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सरकारी योजनेच्या एका लाभार्थ्याला देण्यात आली. त्यानंतर इतर काही लाभार्थ्यांनाही प्रती देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जानेवारी रोजी निवडणूक संकल्पपत्रासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर १५ लाखांपेक्षा जास्त सूचना प्राप्त झाल्या होत्या.
संकल्पपत्रातील प्रमुख घोषणा
रोजगार आणि उद्योजकतेवर भर, मोफत शिधा योजना पुढील पाच वर्षे सुरु राहणार, गरीबांसाठी तीन कोटी घरे बांधणार, गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे असेल, कोट्यवधी गरिबांवरील वीजबिलाचा भार कमी करून शून्य करण्यासाठी काम करणार, पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार, ७० वर्षांवरील वृद्धांसह तृतीयपंथीयांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार, पाईपमार्फत स्वस्त गॅस घराघरात पोहोचवणार, महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न, तीन कोटी महिलांना लखपती दीदी करणार, महिलांना आयटी, पर्यटनाकडे वळवणार, सर्व्हायकल कॅन्सरच्या उपचारावर भर, मुद्रा योजना १० लाखांवरून २० लाखांवर, ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार
भारतीयांचे जीवनमान उंचवण्याकडे आमचे विशेष लक्ष – पंतप्रधान
संपूर्ण देशाला भाजपच्या जाहीरनाम्याची प्रतिक्षा असते. आज अतिशय शुभ दिवस आहे. आज काही राज्यात नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. संपूर्ण भारताला भाजपाच्या संकल्पपत्राची प्रतिक्षा होती. भाजपाने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. देशातील जनतेला भाजपावर विश्वास आहे. हा जाहीरनामा युवा, शेतकरी, महिला शक्ती, गरीबांवर आधारीत आहे. भारतीयांचे जीवनमान उंचवण्याकडे आमचे विशेष लक्ष आहे.
स्पष्ट जनादेशामुळे स्पष्ट निकाल – नड्डा
भाजपच्या संकल्प पत्राच्या प्रकाशनापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, २०१४ मध्ये, जेव्हा पंतप्रधान मोदी संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले तेव्हा ते म्हणाले होते, आमचे सरकार गरीब, खेडी आणि समाजाच्या तळा-गाळातील लोकांसाठी समर्पित आहे. ते प्रत्यक्षात आणून गेल्या १० वर्षांत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नेतृत्वाखाली देशाला पुढे नेण्याचे काम केले आहे. जनतेने आम्हाला स्पष्ट जनादेश दिला. त्यामुळे स्पष्ट निकाल आले. जनतेने स्पष्ट जनादेश दिला आणि कलम ३७० रद्द करण्यात आले.
कॉंग्रेसला देश, रामललापेक्षा व्होट बँकेचे राजकारण महत्वाचे
राममंदिराबाबत बोलताना ते म्हणाले, आम्ही ते दिवस पाहिले जेव्हा काँग्रेसचे वकील उभे राहून न्यायालयीन प्रक्रिया थांबवण्याचा प्रयत्न करायचे आणि म्हणायचे की, त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल. त्यांना देशाची चिंता नव्हती, त्यांना रामलल्लाची चिंता नव्हती. त्यांनी फक्त व्होट बँकेचे राजकारण करत अडथळे निर्माण केले. पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भव्य राम मंदिर बांधले गेले.
भारतीय राजकारणात मोदींची गॅरंटी २४ कॅरेटसारखी शुद्ध – राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, जाहीरनाम्याचा प्रत्येक संकल्प हा मोदींच्या गॅरंटीसह युक्त आहे. भारतीय राजकारणात मोदींची गॅरंटी २४ कॅरेटसारखी शुद्ध मानली जाते. भारतातच नाही तर जगभरातील राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यासाठी एक गोल्ड स्टँडर्ड आहे. मला विश्वास आहे की, जे संकल्प येथे मांडले ते २०४७ पर्यंत एका विकसित भारताच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाला आकार आणि विस्तार देईल.