कोरोनानंतर दरवर्षी माहेरून पैसे आण म्हणून विवाहितांचा छळ होत असल्याच्या शेकडो तक्रारी पोलिसांत दाखल होत आहेत. दुसरीकडे मोबाईल व सोशल मीडियावरील ओळखीतून मैत्री, प्रेम आणि आणखी काही आमिष, यातून महिला- तरुणी, अल्पवयीन मुली पळून जाणे किंवा पळवून नेण्याचे, बेपत्ता होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. शहर-ग्रामीणमधील १८ वर्षांवरील ४८७६ महिला तर ९०० अल्पवयीन मुली मागील साडेतीन वर्षांत बेपत्ता झाल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे ९२७ महिला-तरुणी व ८२ अल्पवयीन मुली अजूनपर्यंत पोलिसांना सापडलेल्या नाहीत.घरात कोणी नसताना किंवा घरातील कोणालाही काहीही न सांगता रात्रीच्यावेळी किंवा दुपारी महिला, तरुणी, अल्पवयीन मुली घरातून बाहेर जातात. अनेकदा महाविद्यालयात गेलेल्या मुली पुन्हा घरी आलेल्या नाहीत. कुटुंबातील वातावरण, चुकीच्या मित्र-मैत्रिणींची संगत, सोशल मीडियातून अनोळखी व्यक्तीशी झालेली ओळख व त्याच्या अमिषात फसलेल्या महिला, तरुणी व अल्पवयीन मुलींचा त्यात समावेश आहे.