महिंद्रा अँड महिंद्राने आपली बहुप्रतीक्षित एसयूव्ही Mahindra Thar 2WD अखेर भारतात लॉन्च केली आहे. ही महिंद्राची सर्वात परवडणारी एसयूव्ही आहे. ज्याची प्रतीक्षा ग्राहक अनेक महिन्यांपासून करत होते. ही कार कंपनी ऑटो एक्स्पो 2023 (Auto Expo 2023) मध्ये लॉन्च करणार अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र कंपनीने ही कार दोन दिवस आधीच लॉन्च केली आहे. ही SUV कार पूर्वी फक्त 4X4 पर्यायात उपलब्ध होती.
आता ती 4X2 पर्यायातही आली आहे. ही ऑफ रोड SUV रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) आणि फोर व्हील ड्राइव्ह (4WD) या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. वीन महिंद्रा थारची प्रारंभिक किंमत 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही कार 10,000 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. कंपनी 14 जानेवारीपासून याची डिलिव्हरी सुरू करणार आहे. महिंद्राची ही कार भारतात मारुतीच्या जिम्नी (Suzuki Jimny) कारला टक्कर देईल. महिंद्राची सध्या बाजारात उपलब्ध असलेली थार आणि नवीन थार ही दिसायला एक सारखीच आहे. पण नवीन थारवर 4×4 लिहिले नाही. 2WD थार हार्ड-टॉप पर्यायासह उपलब्ध असेल.
यात ऑटो स्टार्ट/स्टॉप फंक्शनसह 4×4 गियर स्लॉट रिकामा ठेवला आहे. ट्रॅक्शन कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल आणि डोअर लॉक/अनलॉक बटणे कंट्रोल पॅनलमधून सेंटर कन्सोलवर हलवण्यात आली आहेत. नवीन थार दोन नवीन रंग पर्यायांमध्ये (ब्लॅझिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाइट) सादर केली गेली आहे. यात 1.5 L डिझेल आणि 2.0 L टर्बो पेट्रोल असे दोन इंजिन पर्याय आहेत. याचा डिझेल व्हेरिएंटची किंमत 9.99 लाख रुपये आणि टर्बो पेट्रोलची किंमत 13.49 लाख रुपये आहे. नवीन थार AX (O) आणि LX ट्रिममध्ये उपलब्ध आहे.
महिंद्रा 2WD व्हेरिएंटमध्ये 1.5-L डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे XUV300 मध्येही आहे. हे इंजिन 117hp पॉवर आणि 300Nm चा पीक टॉर्क देते. जे 6-स्पीड मॅन्युअल (MT) गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. तसेच याचे दुसरे इंजिन 2.0-L टर्बो पेट्रोल 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह सादर केले गेले आहे. हे इंजिन 152hp पॉवरसह 320Nm टॉर्क देते.