सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपला चांगलेच झोडपून काढले आहे. सोलापुरात भाजपचे दोन खासदार निष्क्रिय ठरल्याने सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत तिसरा उमेदवार भारतीय जनता पक्षाने उपरा दिला आहे, अशी टीका त्यांनी केली.
भाजपचे शरद बनसोडे निष्क्रिय होते म्हणून उमेदवार बदलला. त्यानंतर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी हे देखील निष्क्रिय निघाले म्हणून भाजपने पुन्हा उमेदवार बदलून उपरा उमेदवार दिला, ही सोलापूरकरांची शोकांतिका आहे. सत्ता असून देखील भाजपला उमेदवार बदलावा लागत आहे, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
सोलापुरातील ‘हेरिटेज गार्डन’ या ठिकाणी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार झाली. महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांची पत्रकार परिषदेत उपस्थिती होती. प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका करत ही निवडणूक नसून एक चळवळ आहे. भारत देशातील संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येत येणे गरजेचे असल्याचे शिंदे म्हणाल्या.
२०१४ मध्ये सरकार १५ लाख देईल ही अपेक्षा ठेवत जनतेने भाजपवाल्यांना निवडून दिले. २०१९ मध्ये जनतेने पुन्हा एकदा विश्वास ठेवत भाजपला सोलापुरात निवडून दिले. मात्र या दोन खासदारांनी सोलापूरला जवळपास २० ते २५ वर्षे मागे नेले, अशी टीका प्रणितींनी केली.