वंचित बहुजन आघाडीचे माढा आणि सोलापूर लोकसभेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. माढाचे उमेदवार रमेश बारसकर आणि सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज सादर केले.
हे अर्ज दाखल करण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने सोलापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं. माढा आणि सोलापूरचे हो दोन्ही उमेदवार कोट्यवधी रुपयाचे मालक असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही उमेदवार हे करोडपती असल्याचे समोर आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी जे शपथपत्र सादर केलंय त्यामध्ये माढाचे उमेदवार रमेश बारसकर यांच्याकडे अडीच कोटी तर सोलापूरचे उमेदवार राहूल गायकवाड दीड कोटीच्या संपत्तीचे मालक असल्याचे सांगितले आहे. राहुल गायकवाड यांच्याकडे 14 लाख 76 हजार रुपयांची जंगम मालमत्ता तर 1 कोटी 31 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघातील ‘वंचित’चे उमेदवार रमेश बारसकर यांच्याकडे 9 लाख 84 हजार रुपयांची जंगम मालमत्ता तर 2 कोटी 35 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.