सहा महिन्यांत उजनी धरणातील तब्बल ५४ टीएमसी पाणी संपले असून सध्या १५ दिवसाला धरणातील पावणेदोन टीएमसी पाणी संपत आहे. दुसरीकडे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा तळ गाठत आहे. त्यातील पाणी ३० मेपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण सोलापूर शहराचा पाणीपुरवठा पाच दिवसाआड केला जाणार आहे.पावसाळा संपल्यावर १७ ऑक्टोबरला उजनीत ९६ टीएमसी (६०.३८ टक्के) पाणी होते, पण आता धरणातील साठा उणे ४० टक्क्यावर आहे. यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरण ६६ टक्क्यांपर्यंत भरले होते, पण तीन महिन्यात सलग तीनवेळा पाणी सोडल्याने धरणाने उन्हाळ्यापूर्वीच तळ गाठला होता. २१ जानेवारीला उजनी उणे झाले आणि आता तीन महिन्यात धरण उणे ४० टक्के झाले आहे. धरणावर पाणीपुरवठ्याच्या ४२ योजना अवलंबून आहेत. त्यातील सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडावे लागते आणि वर्षातून तीनवेळा विशेषत: उन्हाळ्यात ते पाणी सोडले जाते.
कडक उन्हाळ्यात नदीतून पाणी सोडताना सात टीएमसीपर्यंत पाणी सोडावे लागते. आता आणखी दोन महिने उन्हाळा असणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सुरवातीला नव्हे तर परतीचा पाऊस पडतो अशी आजवरील स्थिती आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीद्वारे औजमध्ये पाणी सोडण्याऐवजी रे नगर व एनटीपीसीच्या माध्यमातून ७० एमएलडी पाणी शहरासाठी घेता येईल का, या पर्यायाची देखील महापालिकेकडून चाचपणी सुरु आहे. हिंदुस्थान समाचार