माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतरही नांदेड लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. नांदेडमध्ये भाजपचा खासदार आहे. तर गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून लढलेले आणि सव्वा चार लाख मतं घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले अशोक चव्हाणदेखील आता भाजपमध्ये आहेत. मात्र तरीही या मतदारसंघात भाजपची दमछाक होताना दिसत आहे. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सहभागी घेणार आहेत. त्यामुळे इथे भाजपसाठी लढत सोपी असणार नाही अशी चर्चा आहे.
माजी मुख्यमंत्री, नांदेडचे माजी खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडची जागा भाजपसाठी सुरक्षित मानली जात होती. मात्र जमिनीवरील परिस्थिती वेगळी आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. मोदी आणि शहा यांचं एकाच मतदारसंघात सभा घेणं अतिशय दुर्मीळ मानलं जातं. नांदेडमध्ये भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांच्या सभा होत असल्यानं हा मतदारसंघ भाजपसाठी अवघड असल्याचं मानलं जात आहे.
२०१४ मध्ये मोदी लाटेतही अशोक चव्हाणांनी नांदेडचा गड राखला. पण २०१९ मध्ये भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांनी चव्हाण यांचा पराभव केला. आता चव्हाण भाजपमध्ये आहेत. भाजपनं चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. चव्हाणांच्या रुपात नांदेडमध्ये काँग्रेसचा तगडा नेता भाजपला मिळाला. मात्र तरीही भाजपला इथून विजयाची शाश्वती वाटत नाही.
मोदी, शहांच्या नांदेडमध्ये सभा होणार आहेत. त्यामुळे भाजपला नांदेडमध्ये विजयाची खात्री वाटत नाही का, असा प्रश्न चव्हाणांना विचारण्यात आला. त्यावर चव्हाणांनी नांदेडमध्ये भाजपची स्थिती उत्तम असून ही जागा नक्की जिंकू असा विश्वास व्यक्त केला. इंदिरा गांधींपासूनच प्रत्येक लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये पंतप्रधानांच्या सभा होत असतात या इतिहासाकडे चव्हाण यांनी लक्ष वेधलं.
चव्हाण यांना बदनामीची भीती
माजी मुख्यमंत्री राहिलेल्या आणि काँग्रेस सोडून भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाणांना बदनामीची भीती सतावत आहे. ‘देशात मोदींची हवा आहे. विकसित भारतासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी मी नांदेडच्या सीटची गॅरंटी दिली आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून गावागावात लीड दिलंच पाहिजे. वरिष्ठ नेत्यांमध्ये माझी बदनामी होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर मताधिक्क्य द्या,’ असं भावनिक आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं आहे.