नागपूर लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांचा उत्साह दिसून येत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सकाळी 7.15 वाजता मतदान केले.
नागपूरच्या महाल परिसरातील भाऊजी दफ्तरी शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. सरसंघचालक सकाळी 7 वाजताच मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांच्यासमवेत नागपूर महानगर संघचालक राजेश लोया हेदेखील होते. दर निवडणूकीत सरसंघचालक सकाळी सर्वात पहिले मतदानकेंद्रावर पोहोचतात व यावर्षीदेखील ही परंपरा त्यांनी कायम ठेवली. बाहेर आल्यावर त्यांनी नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान आपला अधिकार व कर्तव्य आहे. देशात 100 टक्के मतदान झाले पाहिजे व त्यासाठीच मी आज सर्वात आधी मतदानाचेच कर्तव्य पार पाडले, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी यावेळी केले.