काही दिवसांपूर्वीच नवीन विवाह झालेला सुनील श्रावण शिंदे हा तुळजापूर- अक्कलकोट सीमेवरील सिंधगाव येथील सासरवाडीला राहायला आला होता. त्याठिकाणी त्याने सख्खा भाऊ अजय व वडील श्रावण आणि नवीन मेव्हणा धमेंद्र विलास भोसले यांच्या मदतीने काही दिवसांत अक्कलकोट उत्तर व दक्षिण भागात सात तर मुरुड व कळंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक घरफोडी केली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धमेंद्रला अटक करून त्याच्याकडून तीन लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उन्हाच्या उकाड्यामुळे रात्रीच्या वेळी अनेकजण घर उघडे ठेवून किंवा गच्चीवर झोपायला जातात. हीच संधी साधून पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी सुनील शिंदे याने त्याचा भाऊ, वडील व मेव्हण्याच्या मदतीने काही दिवसांतच ४० ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन दुचाकी, एक मोबाईल, असा एकूण तीन लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
जिल्हाभरात विविध ठिकाणी होणाऱ्या घरफोड्यांमुळे पोलिसांसमोर चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान होते. अक्कलकोट परिसरात मागील गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घ्यायला गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकाला घरफोडीतील आरोपी त्याठिकाणी येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार त्यांनी अक्कलकोट बसस्थानक परिसरात सापळा लावून धमेंद्र भोसले यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने सुनील, अजय व श्रावण यांच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी श्रावण जामनाशा शिंदे व सुनील श्रावण शिंदे, अजय श्रावण शिंदे (तिघेही रा. सुभा, जि. धाराशिव) व नात्यातील दिनेश पंपू शिंदे (रा. मानमोडी, ता. तुळजापूर) आणि अटकेतील धमेंद्र विलास भोसले (रा. सिंधगाव, ता. तुळजापूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित तीन संशयित आरोपींचा शोध सुरु आहे.