हजारो कोटींचा बँक घोटाळा करून भारतातून पसार झालेल्या नीरव मोदी याची संपत्ती अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँकेने २५०० चौरस मीटर जमीन ताब्यात घेण्यासाठी २ एप्रिल २०२४ रोजी नोटीस जारी केली आहे.
पीएनबी बँक घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा ठरला आहे. पंजाब नॅशनल बॅकेला ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून पळूनगेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे. तो घोटाळा करुन दीड वर्षांपासून फरार झाला होता. नीरव मोदींविरोधात लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. दरम्यान पीएनबी बँकेला मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या परवानगीला ईडी हायकोर्टाने आव्हान दिले होते. मात्र जनतेचा पैसा असल्यामुळे नीरव मोदीविरोधात दाखल आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाला ४२४ काेटी रूपयांच्या ९ मालमत्ता जप्त करण्याची विशेष न्यायालयाने बँकेला दिली हाेती. तसेच ४८ मालमत्तांपैकी ४७ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्याअनुषंगाने २०१९ पासून पंजाब नॅशनल बँकेने १४ हजार कोटींच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी असलेल्या नीरव माेदीच्या संपत्तीचे सर्चिंग सुरू केले आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात जमीन जप्तीसाठी पीएनबीने नोटीस जारी केली आहे.
८ लाख ६२ हजार ९५१ रूपयांची थकबाकी
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथील सर्व्हे क्रमांक ३१३ मध्ये २५०० चौरस मीटर जमीन फरार आरोपी नीरव मोदी याच्या नावे असल्याची नोंद आहे. या जमिनीवर पंजाब नॅशनल बँकेकडून ३० जून २०१८ रोजी कर्ज घेतल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे. १४.३० टक्के दराने व्याजासह ८ लाख ६२ हजार ९५१ रूपयांची थकबाकी दर्शविण्यात आली आहे. मुंबई येथील कर्जवसुली न्यायाधिकरणाचे वसुली अधिकारी आशु कुमार यांच्या स्वाक्षरीने नीरव डी. मोदी, ग्रोसवेनोर हाऊस, दुसरा माळा पेड्डर रोड, मुंबई याच्या नावे असलेली २५०० चौ.मी. जमीन जप्त करण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे.