घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग पडून झालेल्या अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा 14 वर गेला आहे. या दुर्घटनेत 75 जण जखमी झाले असून त्यापैकी एक जण गंभीर जखमी आहे. तर, 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 74 लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेची माहिती मिळताच रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारने जाहीर करण्यात आली आहे. तर, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुंबईत काल अचानक झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने दाणादाण उडाली. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. होर्डिंगखाली जवळपास 80 वाहने अडकली होती. त्यानंतर वेगाने बचावकार्य सुरु करण्यात आलं. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल केला. राज्य सरकारच्या जागेत हा अनधिकृत बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आजूबाजूला तीन अजून मोठे अनाधिकृत होर्डिंग्ज बॅनर आहे. त्याच्यावर देखील पालिका कारवाई करत आहे.