देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच लहर असून इंडी आघाडी हतबल आणि निराश झाली आहे. त्यामुळे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता येईल असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या यांनी केले. भारतीय जनता युवा मोर्चाने दादर (पुर्व) येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ओमप्रकाश चौहान, मुंबई भाजपा उपाध्यक्ष श्वेता परुळकर, मुंबई युवा मोर्चा महामंत्री दीपक सिंह यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील लोकसभेचे उमेदवार पियुष गोयल, ॲड.उज्वल निकम, आ. मिहिर कोटेचा यांच्या प्रचारार्थ दाैरा होता. मानखुर्द येथे दाैर्याला सुरुवात झाली. सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन ते वसंत स्मृती सभागृहात पत्रकार परिषदेसाठी आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खा. तेजस्वी सुर्या म्हणाले,मी उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांचा दौरा केला. त्यात सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद पंतप्रधान मोदींना मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे वादळ आहे. काँग्रेस नेत्यांची विधाने भारताचे विभाजन करणारी आणि देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी आहेत
काँग्रेस पक्ष देशासाठी घातक आहे. नरेंद्र मोदी राहुल गांधी यांच्यासोबत डिबेट करतील.मात्र; राहूल गांधी यांनी स्वतःला निदान पंतप्रधान पदासाठी अधिकृत उमेदवारी घोषित करावी मोदी यांच्यासमवेत चर्चा करण्यासाठी त्या बरोबरीची व्यक्तीसमोर असायला हवी. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीचा पराभव होत असल्यामुळेच ते पैसे वाटत असल्याचा आरोप करीत आहे, तसेच भाजपाचा जाहीरनाम्यात लोकहितासारख्या बाबी घेतल्या आहेत. पण;काॅग्रेसच्या जाहीरनाम्यात लोकहिताचे काहीच नाही.
खा. सूर्या म्हणाले, काँग्रेसचा जाहीरनामा देशाचे नुकसान करणारा आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकार शेतकरी विरोधी आहे. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना एकही बॉम्बस्फोट झाला नव्हता. मात्र, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर बॉम्बस्फोटाची घटना घडली. अल्पसंख्याकांचे लांगुलचालन सुरू आहे. उघड उघड भारत विरोधी घोषणा दिल्या जातात. काँग्रेसने असंविधानिक पद्धतीने मुस्लिम आरक्षण लागू करून ओबीसींचे आरक्षण लुटण्याचे काम केले आहे असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणूकीचा निकाल झाल्यावर कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस होणार का ?असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, कर्नाटकमध्ये आमदारांना सांभाळण्याचे काम हे काँग्रेस पक्षाचे आहे, ते भाजपाचे नाही, असे सांगत तेजस्वी सुर्या यांनी सांगितले. राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची रोज होणारी वक्तव्ये ही मनोरंजनात्मक असतात, त्यांची वक्तव्य अनेक वर्ष मी ऐकत आलो आहे,असे म्हणत तेजस्वी सुर्या यांनी त्यांची खिल्ली उडवली.