सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टवरुन नांदुरघाट गावात दोन गट आमने-सामने आले. ही घटना बुधवारी, रात्री ८ वाजेच्या सुमारास केज तालुक्यातील नांदुरघाट गावात घडली. क्षणातच, एकमेकांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. या घटनेत एका महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच केजचे सहायक पोलीस अधीक्षक कमलेश मिणा, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे फोर्स घेऊन गावात पोहोचले. या घटनेमुळे रात्री उशिरापर्यंत गावात तणावपूर्ण शांतता होती.
गावातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. ही पोस्ट वादग्रस्त असल्याकारणाने दुसऱ्या गटातील लोक आक्रमक झाले. बोलता बोलता वाद विकोपाला गेला आणि दोन गटात हाणामारीस सुरुवात झाली. त्यानंतर दोन गटांत तुफान दगडफेक करण्यास आली. या घटनेत एका व्यक्तीच्या डोक्याला दगड लागला असून त्याला दोन टाके पडले आहेत. तसेच महिलेच्याही नाकाला गंभीर जखम झाली आहे. तिसरी व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. त्यानंतर नांदुरघाटसह आजूबाजूच्या गावांतील लोक घटनास्थळी पोहोचले.
नांदुरघाटच्या ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच केजसह जिल्ह्यातील पोलिसांची कुमक गावात पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी गावासह परिसरातील गावातील नागरिकांशी संवाद साधून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. रात्री ११ वाजेपर्यंत गावात पोलिसांची मोठी फौज होती. रात्री उशिरा पोलिसांनी या घटनेची नोंद करत संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे.