गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज, सोमवारी अहमदाबाद विमानतळाहून 4 जिहादी दहशतवाद्यांना अटक केलीय. हे दहशतवादी आयएसआयएसशी संबंधीत असून मुळचे श्रीलंकेतील आहेत. तसेच हे चेन्नईहून गुजरातमध्ये दाखल झाले होते.
यासंदर्भातील माहितीनुसार, हे 4 दहशतवादी अहमदाबादमध्ये येत असल्याची माहिती मिळाली होती. केंद्रीय एजन्सीने हे इनपुट गुजरात एटीएसला शेअर केले होते की इस्लामिक स्टेटशी संबंधित हे दहशतवादी विमानतळावर आले होते. हे सर्व दहशतवादी श्रीलंकेतील असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरात एटीएसने चारही दहशतवाद्यांना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली आहे. अहमदाबाद विमानतळावर दहशतवादी कोणत्या उद्देशाने आले होते, याची माहिती मिळालेली नाही. त्यांच्याकडून मिळालेल्या तिकिटांच्या आधारे ते चेन्नईहून आल्याचे स्पष्ट झालेय. इस्लामिक स्टेटचे हे दहशतवादी कोलंबोहून तामिळनाडूत आणि तामिळनाडूतून अहमदाबादमध्ये आल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. दरम्यान या दहशतवाद्यांना वेळीच अटक झाल्याने संभावित घातपात टळला आहे.