विधान परिषदेवरील दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केले. नव्या वेळापत्रकानुसार, येत्या २६ जूनला निवडणूक होणार असून, एक जुलै रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर काही तासातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
विधानपरिषद आमदार अॅड. अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. अनिल परब यांचा परिषदेवरील कार्यकाळ २७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. ठाकरे गटाचं विधानसभेतील संख्याबळ पाहता परब यांना विधानपरिषदेवर पुन्हा निवडून जाणं आव्हानात्मक ठरु शकतं. त्यामुळे आता पदवीधर मतदारसंघाच्या मार्गाने त्यांना परिषदेवर पाठवण्याची तयारी सुरु आहे.
विधानपरिषदेवरील मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे विलास पोतनीस आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार आहे. पोतनीसांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. याशिवाय मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरेंच्या युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांचंही नाव चर्चेत होतं. मात्र त्यांच्याऐवजी परबांना तिकीट देण्यात आलं आहे. दुसरीकडे, मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता महायुतीकडून कोणाला रिंगणात उतरवलं जाणार, हे पाहण्याची उत्सुकता आहे.
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांची मुदत सात जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच या निवडणुकीबाबत घोषणा करून वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार ही निवडणूक १० जूनला होणार होती. मात्र, या वेळापत्रकावर आक्षेप घेऊन अनेक शिक्षक आणि इतर संघटनांनी त्यात बदल करण्याची मागणी आयोगाकडे केली होती. अखेर संघटनांनी केलेल्या मागणीची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने १० जूनच्या निवडणुकीचे वेळापत्रक रद्द करून ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
या नव्या वेळापत्रकानुसार ३१ मे रोजी या निवडणुकीसंदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात येणार आहे. सात जूनपर्यंत या निवडणुकीसाठी इच्छुकांना उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. १० जूनपर्यंत प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, १२ जूनपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २६ जून रोजी या चारही मतदारसंघांसाठी निवडणूक होणार असून, सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. एक जुलै रोजी मतमोजणी पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने जाहीर केले.