उत्तम कथानाक,तगडी स्टारकास्ट, भन्नाट गाणी…असा हा ११ वर्षांपूर्वी आलेला मराठी सिनेमा म्हणजे ‘दुनियादारी’. ‘दुनियादारी’ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा हा सिनेमा थिएटरमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झालाय.
खट्याळ मैत्री, नात्यातलं प्रेम, दुरावा, विनोदाचा तडका हे सगळं या सिनेमात पाहायला मिळालं. त्यामुळं या सिनेमातलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. आता ११ वर्षानंतर पुन्हा एकदा दुनियादारी प्रेक्षकांना थिएरमध्ये अनुभवता येणार आहे.
तगडी स्टारकास्ट
सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित ‘दुनियादारी’ हा सिनेमा. शिरीन, प्रीतम, श्रेयस, डीएसपी, मिनू, साई, एमके, सॉरी, सुरेखा ही या सिनेमातली लक्षात राहणारी पात्रे. स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे, जितेंद्र जोशी, वर्षा उसगावकर, संदीप कुलकर्णी, प्रणव रावराणे अशी तगडी गँग या सिनेमात होती. दुनियादारीतल्या गाण्यांची वेगळीच जादू प्रेक्षकांवर झाली होती. दिग्दर्शक संजय जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.
डॉयलॉग आजही होतात व्हायरल
या सिनेमातले डायलॉग्जही प्रचंड गाजले. आजही सोशल मीडियावर हे डायलॉग व्हायरल होताना दिसतात.’मेहुणे मेहुणे मेहुण्यांचे पाहुणे’, ‘सस्ती चिजो का शॉक हम भी नही रखते’ असे अनेक डायलॉग आजही लोकप्रिय आहेत.
पुन्हा ‘दुनियादारी’
दरम्यान, दुनियादारी सिनेमाच्या सीक्वलचीही घोषणा करण्यात आली होती. तेरी मेरी यारी.. चल करू दुनियादारी म्हणत प्रत्यक्षात ते मैत्रीचे क्षण आमच्या सोबत जगले. ते जग , ती मैत्री , ते प्रेम आणि तीच दुनियादारी आता पुन्हा घेऊन आलोत मैत्रीच्या नव्या ढंगात आणि प्रेमाच्या नवीन रंगात .एका नव्या युगाची , नवीन रंगाची न्यु एज ईस्टमन कलर लव्हस्टोरी. तेरी मेरी यारी… आता पुन्हा दुनियादारी.’ ही पोस्ट गेल्या वर्षी चांगलीच व्हायरल झाली होती.
‘दुनियादारी पार्ट २’ मध्ये काय?
दुनियादारीच्या सीक्वलमध्ये काय होईल याची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता आहे. पहिल्या भागातील कलाकार पुन्हा नव्या दुनियादारीमध्ये दिसणार की नवे चेहरे समोर येणार याचीही उत्सुकता आहे. अजून तरी याबाबत संजय जाधव यांनी सगळया गोष्टी गुलदस्त्यातच ठेवल्या आहेत.