पुण्यातील अपघातानंतर सोलापूर पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांत शहर पोलिसांनी १०६ तर ग्रामीण पोलिसांनीही अंदाजे ८० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागला आहे. ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’च्या कारवाईसाठी शहर-ग्रामीणमधील वाहतूक पोलिसांकडे ९७ ब्रेथ ॲनालायझर मशिन देण्यात आल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात २०२३ मध्ये ७२३ जणांचा तर २०२४ मध्ये जवळपास दीडशे जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. अपघात रोखण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालकांवर कारवाई सुरू केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी नांदणी, मंगळवेढा (इचगाव), सांगोला (आढळगाव), वळसंग, सावळेश्वर, वरवडे, पेनूर या टोल नाक्यांवर कारवाई सुरू केली आहे. दुसरीकडे ग्रामीण पोलिसांची दररोज सायंकाळी सहा ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत रात्रगस्त देखील सुरू आहे. शहर वाहतूक पोलिसांनीही शहरात येणाऱ्या रस्त्यांसह शहराअंतर्गत विविध ठिकाणी मद्यपी वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. सायंकाळी पाच ते रात्री ११ तर कधी रात्री दहा ते साडेबारा वाजेपर्यंत ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जात असल्याचे शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी दराडे, धनाजी शिंगाडे यांनी सांगितले.