कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ यामुळे मराठवाड्यातील शेतकरी नेहमीच संकटात सापडताना पाहायला मिळतो. त्यामुळे नापिकी आणि आर्थिक परिस्थितीमुळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवत आहे. धक्कादायक म्हणजे हा आकडा वर्षोनुवर्षे वाढत चालला आहे. 2020 पासून 2022 पर्यंतचा आकडा मन सुन्न करणारा आहे. एकट्या 2022 मध्ये मराठवाड्यात तब्बल 1 हजार 23 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्यात सर्वाधिक 202 आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.
राज्यात सत्तेत आलेला प्रत्येक सत्ताधारी मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलणार असल्याचा दावा करतात. मात्र गेल्या तीनवर्षांची आकडेवारी पाहिली असता, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा 730 च्या आत होता, परंतु 2020 मध्ये 773 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर 2021 मध्ये तब्बल 887 जणांनी मृत्यूला कवटाळले होते. आता हा आकडा वाढून 2022 मध्ये 1हजार 23 झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात सर्वाधिक आत्महत्या मागच्या वर्षात झाल्याचं समोर आले आहे.
कधीकाळी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणारे चित्र असलेल्या मराठवाड्याला दरवर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागायचा. पण आता त्याच मराठवाड्यात गेली तीन वर्षे अतिवृष्टी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अतिवृष्टीमुळे खरीपाचे पीक हातून जात आहे. तर रब्बीच्या पेरणी होताच परतीचा फटका बसतो. त्यात महावितरणकडून वीज कापल्याने उरल्यासुरल्या पीकांना पाणी भरता न आल्याने ते जळून जातात. गेल्या तीन-चार वर्षात मराठवाड्यात जणू हे समीकरण बनलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत हतबल झालेला बळीराजा टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवत आहे. मात्र 2022 मध्ये हा आकडा मोठ्याप्रमाणावर वाढला असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.
2022 मधील शेतकरी आत्महत्या आकडेवारी
अ.क्र. जिल्हा शेतकरी आत्महत्या
1 औरंगाबाद 180
2 जालना 125
3 परभणी 77
4 हिंगोली 44
5 बीड 220
6 लातूर 63
7 उस्मानाबाद 117
8 नांदेड 147
एकूण 1023