अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh Election Result) आणि सिक्कीम विधानसभा (Sikkim Assembly Election Result) निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं (BJP) एकहाती सत्ता मिळवली आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं (SKM) सलग दुसऱ्यांदा विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरु ठेवली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत. बातमी लिहून प्रसिद्धकरेपर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार भाजपनं 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत.आतापर्यंत एकूण 50 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपनं त्यामध्ये 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर, ते अजून 5 जागांवर आघाडीवर आहेत. याशिवाय नॅशनल पीपल्स पार्टीनं 4 जागांवर विजय मिळवला असून ते 1 जागेवर आघाडीवर आहेत. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलनं 2 जागांवर विजय मिळवला आहे.
अजित पवारांच्या नेतृ्त्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं अरुणाचल प्रदेशात खातं उघडलं आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नसला तरी ते एका जागेवरुन आघाडीवर आहेत. एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे तर दोन ठिकाणी ते आघाडीवर आहेत.
सिक्कीममध्ये सत्ताधाऱ्यांना पुन्हा कौल
सिक्कीमच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं सत्ता मिळवली आहे. सिक्कीम राज्यात विधानसभेच्या 32 जागा आहेत. यापैकी सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं 21 जागांवर विजय मिळवला आहे. तर, 10 जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला केवळ 1 जागा मिळवता आली आहे.
भाजपकडून जल्लोष सुरु
अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकतर्फी सत्ता मिळवल्यानंतर प्रदेश भाजपनं जल्लोष सुरु केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवतं आणि नाचत आनंद साजरा केला.
अरुणाचल प्रदेशमध्ये भाजप 10 जागांवर बिनविरोध
अरुणाचल प्रदेशमध्ये सत्तारुढ भाजपला मतदानापूर्वीच मोठं यश मिळालं होतं. भाजपनं अरुणाचल प्रदेशमध्ये 60 जागांवर उमेदवार दिले होते. तर, काँग्रेसनं फक्त 19 जागांवर उमेदवार दिले होते. भाजपला अरुणाचल प्रदेशमध्ये 10 जागांवर बिनविरोध विजय मिळाला होता.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला
लोकसभा निवडणुकीची आणि आंध्रप्रदेशसह ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आध्रप्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेस तर ओडिशामध्ये बीजेडी सत्तेत आहे.