राजकारणात काही गणित असतात. ती गणिते सोडविणारे भारतातील गणितज्ञ हे शरद पवार आहेत हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकालाने सिद्ध केले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी शरद पवार यांच्या रणनीतीचे काैतुक केले.कन्हेरी येथील निवासस्थानी माध्यमांशी श्रीनिवास पवार बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, या निवडणुकीत अजित पवार कमी पडले असे मी म्हणणार नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीत भरपूर प्रयत्न केले. त्यांना राजकारणाचादेखील चांगला अनुभव आहे. सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत, पण साहेब वस्ताद आहेत. वस्ताद हा वस्तादच असतो. अजितदादांवर जबाबदारी साेपवून त्यांनी दिल्लीत लक्ष घातले. त्यामुळे त्यांचा बारामतीचा संपर्क कमी होता. म्हणून ते त्यांचा डाव विसरले असा त्याचा अर्थ होत नसल्याचे श्रीनिवास पवार म्हणाले.