जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील सैदा सोहल भागात सुरू असलेल्या चकमकीत बुधवारी आणखी एक दहशतवादी मारला गेला. आता या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या 2 झाली आहे. तसेच सीआरपीएफच्या एका जवानाने हौतात्म्य पत्करले आहे.
याबाबत अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांनी मंगळवारी रात्री गावात गोळीबार केल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला होता. उपचारादरम्यान जवानाला वीरमरण आले. सुरक्षा दलांना नागरी परिसरात आणखी एक दहशतवादी लपून बसल्याचा संशय असल्याने परिसरात शोध मोहीम सुरू आहे. या चकमकीत हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानाचे नाव कबीर दास असून तो मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील बिचुआ तहसीलमधील पुलपुलडोह गावचा रहिवासी आहे. दिवंगत कबीर दास 2011 मध्ये सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल म्हणून भरती झाला होता. त्याचे 4 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्याच्या कुटुंबात आई, पत्नी,लहान भाऊ आणि विवाहित दोन बहिणी आहेत. कबीर यांच्या निधनाचे वृत्त समजताच छिंदवाड्याचे खासदार विवेक बंटी साहू आणि महापौर विक्रम अहाके यांनी त्यांच्या घरी पोहोचून कुटुंबाचे सांत्वन केले.