एका बाजूला संपूर्ण कोल्हापूर गुडघाभर खडड्या असतानाच मंजूर काम सोडून सोयीच्या ठिकाणी डांबरीकरण का केले नाही? अशी विचारणा करून माजी नगरसेवकाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी बुधवारी सायंकाळी दिली होती. या घटनेनंतर महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचा कडेलोट झाला असून त्यांनी आज काम बंद आंदोलन केले. शिंदे गटातील माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांनी शिवागीळ केल्याचा आरोप आहे. महापालिकेतील कनिष्ठ अभियंता उमेश बागुल यांना काल अश्लील शिवीगाळ केली होती.
महापालिकेच्या कनिष्ठ अभियंतला माजी नगरसेवकाने अश्लील शिवीगाळ केल्याने वादाला तोंड फुटले. बुधवारी झालेल्या वादावादीनंतर आज महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले. माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांनी रोड रोलरखाली टाकून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अत्यंत भयभित झालेल्या कनिष्ठ अभियंत्याने ठिकाणाहून काढता पाय घेतला. या घटनेनंतर अधिकारी, कर्मचारी चांगलेच संतापले होते.
शहरामध्ये रस्ता डांबरीकरणाचे काम मंजूर असलेल्या ठिकाणी बहुतांश काम पूर्ण झाले असतानाही इतर ठिकाणी उर्वरित डांबरीकरण करावे लागणार असल्याचे माजी नगरसेवकाने सांगितले. परंतु, वरिष्ठांच्या आदेशाने मंजूर ठिकाणीच काम करू असे संबंधित कनिष्ठ अभियंत्याने भूमिका घेतल्याने वादाला सुरुवात झाली. यावेळी माजी नगरसेवकाने थेट दमदाटी आणि अरेरावीची भाषा सुरु केली. मला न विचारता डांबरीकरणाचे काम का केले? अशी विचारणा करत शिवीगाळ केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर संबंधित अभियंत्याने झाला प्रकार वरिष्ठांचा कानावर घातला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील रस्यांची विदारक अवस्थाा गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर शहरातीर रस्त्यांची अवस्था महाभयानक झाली आहे. सर्वच स्तरातून सडकून टीका झाल्यानंतर महापालिकेकडून पहिल्यांदा पॅचवर्क करण्यात आले. यानंतर आता अत्यंत भयानक झालेल्या मार्गांवर डांबरीकरण सुरु केलं आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था प्रमुख समस्या झाली असून त्यावर लक्ष केंद्रित करा, महिन्यात प्राधान्याने रस्त्यांची कामे करा, 40 कोटींचा निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली होती.