जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीतील संघर्ष हा अधिक गडद होत चालला असून पाचोर्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यातील आरोप प्रत्यारोप हे चव्हाट्यावर आले आहेत. विधानसभेच्या जागा वाटपापूर्वीच उमेदवारीवरून हा संघर्ष वाढत चालला आहे.
जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले पाचोर्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष वाढला असून दोघांमधील आरोप प्रत्यारोप हे चांगले चव्हाट्यावर आले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत अमोल शिंदे यांनी किशोर पाटील यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील शिवसैनिक हे भाजपच्या उमेदवाराचे काम करायला तयार नव्हते मात्र तरीही विधानसभा निवडणुकीत भाजप आमच्या सोबत नसणार हे गृहीत धरूनच जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचं शिवसैनिकांनी काम करून शिवसैनिकांच्या जीवावर व मेहनतीवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झाल्याचा दावा आमदार किशोर पाटलांनी केला आहे.