सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारचा ५० टक्के हिस्सा देण्याचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन आगामी अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये या रेल्वे मार्गासाठी भरीव निधीची तरतूद करण्याची विनंती आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.
श्री क्षेत्र तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वे मार्गाने जोडावे ही आई तुळजाभवानी मातेच्या जगभरातील भाविक भक्तांची अनेक दिवसापासूनची इच्छा आहे. पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी या रेल्वे मार्गाची घोषणा करून राज्य व केंद्र सरकारच्या ५०-५० टक्के निधीतून या प्रकल्पास मान्यता दिली होती. सन २०१९ मध्ये या कामाचे भूमिपूजन देखील झाले. परंतु महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून हा विषय प्रलंबित राहिला. केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्यासह आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी ठाकरे सरकारकडे अनेकदा मागणी करूनही हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला नाही, व तत्कालीन सरकारने निधीची तरतूद करण्यात आली नाही.
आज भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने बार्शी येथे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार च्या निधीचा विषय तातडीने मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन मान्यता देण्याची विनंती करत आगामी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी केली. तसेच या रेल्वे मार्गाचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारकडे देखील भरीव निधीची तरतूद करण्याबाबत शिफारस करण्याची विनंती केली. या रेल्वे मार्गामुळे धाराशिव रेल्वेचे जंक्शन होणार असून यामुळे दळणवळणाला चालना व पर्यायाने अर्थकारणाला मोठी गती मिळणार आहे.
ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लवकरच हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन पुरवणी मागण्यांमध्ये या रेल्वेमार्गासाठी निधीची तरतूद करण्याचे शिष्टमंडळाला आश्वस्त केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जि. प. अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख,जिल्हा मजूर फेरड्रेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे, पं.स. माजी उपसभापती संजय लोखंडे, माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती दत्ता देशमुख,माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, पं.स. माजी उपसभापती प्रदिप शिंदे, देवा नायकल, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.