सोलापूर , 27 जून (हिं.स.) पोलिस भरतीतील उमेदवारांची सध्या मैदानी चाचणी सुरू असून सोलापूर शहर पोलिसांनी त्यांच्याकडील पदांसाठी आलेल्या सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली आहे. आता सोलापूर ग्रामीण पोलिसांकडील उमेदवारांची संपूर्ण मैदानी चाचणी शनिवारी (ता. २९) संपणार आहे. मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांमधून एका पदासाठी १० या प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.
७ जुलै रोजी सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत सोलापूर शहर पोलिस भरतीतील मैदानीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. दरम्यान, २८ ते २९ जून दरम्यान मैदानी संपणाऱ्या शहर-जिल्ह्यातील उमेदवारांची लेखी परीक्षा ७ जुलैलाच होईल, असे सूत्रांनी सांगितले. त्याप्रमाणे उमेदवारांना कळविले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित शहर-जिल्ह्यांची लेखी होईल,शहर पोलिस दलातील चालक शिपाई पदासाठी पोलिस भरतीत उतरलेल्या ५१२ जणांपैकी ३८१ उमेदवार मैदानी चाचणीत उत्तीर्ण झाले आहेत.
तर पोलिस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या ७८५ उमेदवारांपैकी ४१३ उमेदवार मैदानी चाचणीत उत्तीर्ण झाले आहेत. मैदानी चाचणीचा निकाल शहर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. आता शहर पोलिस दलातर्फे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची परीक्षा रविवारी (ता. ७) सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत श्री वीरतपस्वी चन्नावीर शिवाचार्य हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (अक्कलकोट एमआयडीसी रोड) येथे होणार आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी सात वाजता हजर राहावे लागणार आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केले आहे.