अमरावती 8 जुलै (हिं.स.)।
अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातील रोशन अरविंद कडू या तरुणाने अत्यंत गरीब परिस्थितीत शिक्षण घेत यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून त्याने यशाला गवसणी घातल्याबद्दल तिवसा मतदारसंघाच्या आमदार माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी रोशन कडू आणि त्याच्या कुटुंबीयांचा घरी भेट देत सत्कार केला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यभरातील अनेक तरुण-तरुणी भाग घेत असतात. यातील काही मोजक्याच तरुणांना यश संपादन करता येते. अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील अशाच अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत रोशन अरविंद कडू या तरुणाने घवघवीत यश संपादन केले आहे.
यूपीएससीतील यशानंतर रोशन कडू याची सीएपीएफ मध्ये असिस्टंट कमांडट म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत असताना त्याने अत्यंत गरीब परिस्थितीत शिक्षण घेत मिळवलेल्या यशाबद्दल तिवसा मतदार संघाच्या आमदार आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी त्याच्या घरी भेट दिली. यावेळी ॲड. ठाकूर यांनी रोशन कडू याचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.
तर अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या मुलाला चांगले संस्कार आणि शिक्षण देणाऱ्या, तसेच खंबीर साथ देणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचाही ॲड. ठाकूर यांनी सत्कार केला. अत्यंत हृदयस्पर्शी वातावरणात पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमामुळे त्याचे आई-वडील आणि रोशन खूपच भारावून गेले होते. यावेळी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे,अमरावती तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित गावंडे, संजय भाऊ कान्होळकर आणि इतर प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.



















