नेपाळच्या पोखरामध्ये झालेल्या अपघातात ७२ जणांचा मृत्यू झाला. विमान अपघातात कोणीही बचावलं नाही. या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशचा एक तरुण त्याच्या मित्रांसोबत या विमानातून प्रवास करत होता. त्यानं विमान लँड होण्याआधी लाईव्ह केलं होतं. अपघातानंतर तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विमान प्रवासादरम्यान मोबाईलला सिग्नल येत नाही. विमान प्रवासावेळी मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवायचा असतो. मग अशा परिस्थितीत लाईव्ह कसं झालं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
विमानात इंटरनेट सेवा सुरू असते का?
अनेक विमानांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली जाते. इनफ्लाईट वायफायचा वापर अनेक प्रवासी इंटरनेट ब्राऊजिंग, सोशल मीडिया चेक करण्यासाठी, ऑनलाईन व्हिडीओ पाहण्यासाठी करतात. ज्या विमानांमध्ये इनफ्लाईट वायफाय दिलं जात नाही, त्या विमानातील प्रवासी टेकऑफ आणि लँडिंगवेळी इंटरनेटचा वापर करतात.
टेकऑफ आणि लँडिंगच्यावेळी विमान जमिनीच्या अगदी जवळ असतं. त्यामुळे मोबाईलला सहज नेटवर्क मिळतं. अनेकदा यावेळी इंटरनेटचा वापर करतात. आता व्हायरल झालेला व्हिडीओ लँडिंगदरम्यानचा आहे. याचा अर्थ मृत प्रवासी तरुणाला त्यावेळी मोबाईल सिग्नल मिळत होतं. त्यानं व्हिडीओ सुरू केला. याच व्हिडीओत विमानाचा अपघात कैद होईल याची कल्पनादेखील त्यानं केली नसेल.
फेसबुकचा लाईव्ह व्हिडीओ जोपर्यंत शेअर केला जात नाही, तोपर्यंत तो प्रोफाईलवर दिसत नाही. त्यामुळे हा व्हिडीओ अपघातानंतर मोबाईलमधून रेकॉर्ड झाला असावा असा अंदाज आहे. तर काही जण लाईव्ह व्हिडीओ कोणीतरी रेकॉर्ड केला असावा असा तर्क देत आहेत.
लाईव्ह व्हिडीओ कोणीतरी रेकॉर्ड केला असावा अशी शक्यता कमीच आहे. कारण फेसबुक लाईव्ह सहजा कोणीच रेकॉर्ड करत नाही. दुसरी शक्यता फेसबुक लाईव्ह संदर्भातील आहे. तरुणानं फेसबुकवर लाईव्ह केलं असतं तर त्यात पाहणाऱ्यांची संख्याही दिसायला हवी होती. ती दिसत नाही. याचा अर्थ हा व्हिडीओ मृताच्या फोनमधून रिकव्हर करण्यात आला असावा. तीच शक्यता सर्वाधिक आहे.
प्रवासादरम्यान फोन स्विच ऑफ करा किंवा फ्लाईट मोडवर ठेवा, अशी उद्घोषणा विमानात केली जाते. मात्र अनेक जण सूचना अमलात आणत नाहीत. विमान प्रवासादरम्यान फोन ऑफ न केल्यास, त्यातील फ्लाईट मोड ऑन न केल्यास अपघात होऊ शकतो का? या प्रश्नांचं सोपं उत्तर नकारार्थी आहे. पण सुरक्षेचा उपाय म्हणून मोबाईल स्विच्ड ऑफ करायला हवा किंवा त्यातील फ्लाईट मोड ऑन करायला हवं.
फोन सिग्नलमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिअरन्सची समस्या येऊ शकते. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. रेडिओ अल्टीमीटरदेखील बाधित होऊ शकतं. रेडिओ अल्टीमीटरचा वापर करूनच पायलट विमान किती उंचीवर आहे त्याची माहिती मिळवत असतो. एक-दोन ऑन असल्यानं फारसा फरक पडत नाही. सगळ्या प्रवाशांचे फोन ऑन असल्यास पायलटच्या रेडिओ अल्टीमीटरच्या सिग्नलला थोडा फटका बसू शकतो.