कल्याणकारी योजना आणि विकासात्मक दृष्टीमुळेच कार्यकर्त्यांचा शिवसेनेवर वाढता विश्वास – मुख्यमंत्री
ठाणे, 27 जुलै, (हिं.स.) – उबाठा गटाच्या युवा सेनेला ठाणे शहरात खिंडार पडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्तिथीत उबाठा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हातात देऊन कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या दोन वर्षातील कल्याणकारी योजना आणि विकासात्मक दृष्टीमुळे जनतेचा महायुती सरकारवर विश्वास वाढला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. उबाठाच्या कार्यकाळात विकासाला लावलेले स्पीड ब्रेकर काढून राज्य प्रगतीच्या मार्गावर आणले असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. शिवसेनेत कार्यकर्त्यांना मिळणारी सन्मानाची वागणूक, यामुळे इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत ओघ सुरूच असल्याचे ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ठाणे शहर उबाठा युवा सेनेचे शहर अधिकारी किरण जाधव, उपजिल्हाप्रमुख अर्जुन डाभी, बाळकूम शाखा प्रमुख अभिषेक शिंदे , शहर उपसमन्वयक दीपक कनोजिया आणि खोपट विभाग अधिकारी राज वर्मा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या शिकवणीच्या आधारावर राज्याचे नेतृत्व करत आहोत. गेल्या दोन वर्षात ग्रामीण तसेच शहरी विकासासाठी महायुती सरकारने लोकाभिमुख निर्णय घेऊन जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफ योजना या सारख्या जनतेचं कल्याण करणाऱ्या योजना सरकार यशस्वीरीत्या राबवत असल्याने राज्यभरातून कार्यकर्त्यांचा ओघ शिवसेनेत वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. एकीकडे विकासात्मक दृष्टी आणि दुसरीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचे विचार अंगीकारून शिवसेना मोठ्या जोमाने काम करत आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम शिवसेना करत आहे,असेही मुख्यमंत्री म्हणाले.



















