पुणे, 1 ऑगस्ट (हिं.स.)।
आरटीई कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर ३९ हजार १८५ बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश झाले आहेत. अद्यापही बहुसंख्य बालकांचे प्रवेश होणे बाकी आहेत. त्यामुळे आता प्रवेशासाठी ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आरटीई अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते. यंदा आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेत सतत काही ना काही विघ्न आलेले आहेत.
यामुळे प्रक्रियेला विलंब झालेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये आरटीई प्रवेशाच्या १ लाख ५ हजार २४२ जागा दर्शविण्यात आल्या.
यासाठी २ लाख ४२ हजार ५१६ बालकांचे अर्ज दाखल झाले. लॉटरीद्वारे ९३ हजार ९ बालकांना प्रवेश जाहीर झाले आहेत.
प्रवेश जाहीर झालेल्या बालकांना शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यातुन प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची आवश्यकता असल्याचे आढळुन आले आहे.
त्यानुसार मुदतवाढीचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी जाहीर केला आहे. ५ ऑगस्टनंतर मात्र मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.