अमरावती2 ऑगस्ट (हिं.स.)
जिल्ह्यात केंद्र शासनाचे ३०० रुपयांचे अनुदान मिळणाऱ्या १,६७,०१४ उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थीना आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. शिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या नावे गॅस कनेक्शन असल्यास त्यांनादेखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती. याबाबत नुकताच शासनादेश जारी झालेला आहे. त्यानुसार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीना वर्षाला तीन मोफत सिलिंडर मिळणार आहेत. यामध्ये गॅस सिलिंडरची बाजारभावानुसार होणारी ८३० रुपयांची रक्कम लाभार्थीजवळून तेल कंपनी घेतील व त्यानंतर केंद्र शासनाचे ३०० रुपये व राज्य शासनाचे ५३० रुपये असे एकूण ८३० रुपये महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. एका महिन्यात एकाच सिलिंडरसाठी शासन अनुदान मिळेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी वा अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठन केली जाणार आहे. या समितीचे सदस्य सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी राहतील. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या नावे गॅस कनेक्शन असल्यास त्यांनाही पहिले गॅस सिलिंडर रक्कम देऊन घ्यावे लागेल. नंतर शासन अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
५.८२ लाख जनरल गॅस कनेक्शन
जिल्ह्यात विविध कंपन्यांचे ५,८२,३६० जनरल गॅस कनेक्शन आहेत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या नावे गॅस कनेक्शन असल्यास त्यांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल. एका कुटुंबातील एकाच लाभार्थीला या योजनेचा लाभ दिला जाईल. केवळ १४.४ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या ग्राहकांनाच योजनेचा लाभ मिळेल.