* आशिष देशमुखांच्या नेतृत्वात ‘वसुली यात्रा’ काढावी – बावनकुळे
नागपूर, 5 ऑगस्ट (हिं.स.) : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पिडीत शेतकरी व खातेदार संघटना, सावनेरतर्फे तीन दिवस भाजपाचे ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून घोटाळ्याचे 153 कोटी व व्याजाचे 1444 कोटी रुपयांची वसुली करून पिडीत शेतकरी व खातेदारांना 2 महिन्यात वाटप करण्यात यावे, ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे रविवारी बेमुदत ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.
यावेळी बावनकुळे म्हणाले, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक घोटाळ्यात पिडीत शेतकरी व खातेदारांना पैसे परत मिळावेत यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे. डॉ आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या या ठिय्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठींबा आहे. या बँकेत पैसा अडकल्यामुळे शेतकऱ्यांना आणि खातेदारांना भयानक त्रास सहन करावा लागला. घोटाळ्यातील पैसे वसुलीचा अधिकार असल्यामुळे सुनील केदार यांनी केलेल्या 153 कोटींच्या घोटाळ्याची रक्कम वसूल करावीच लागेल. जेएन पटेल कमिटीसमोर ज्यांचे पैसे बुडाले त्या शेतकऱ्यांचे व खातेदारांचे अर्ज गेले पाहिजेत. हे अर्ज घरोघरी जाऊन गोळा करा.
हे सर्व अर्ज घेण्याकरिता संविधान चौकात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणल्याशिवाय राहणार नाही. हे अर्ज सरकारसाठी असणार आहेत. पूर्ण नागपूर जिल्ह्यात फिरून आणि ‘वसुली यात्रा’ काढून अर्ज जमा करण्याचा अभिनंदनीय निर्णय घेण्यात आला आहे. हे अर्ज घेऊन डॉ. आशिष देशमुख हे संविधान चौकात जेव्हा उपस्थित राहतील तेव्हा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिथे हे अर्ज घेण्यासाठी बोलावेन. त्यासाठी पक्षाला व देवेंद्र फडणवीस यांना विनंती करेन की, हे शेतकऱ्यांचे अर्ज घेतले पाहिजेत आणि त्यांना न्याय दिला पाहिजे. ज्या लोकांचे अर्ज येतील त्या सर्वांसाठी सरकारच्या माध्यमातून वसुली झाली पाहिजे. या वसुलीकरिता लढावे लागणार आहे. आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता ही लढाई सुरु होईल. डॉ. आशिष देशमुख यांनी ही ‘वसुली यात्रा’ तातडीने काढावी.
डॉ. आशिष देशमुख सुरुवातीला आपल्या भाषणात म्हणाले, मागील 22 वर्षात कित्येक पिडीत शेतकरी, खातेदार बर्बाद झाले. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पगाराचे पैसे नोकरदार वर्गाला मिळाले नाहीत. कित्येक मुलींचे लग्न मोडल्या गेले. सुनील केदारांनी लोकांचे पैसे लुटले. त्यांच्या दहशतीमुळे लोकं बोलत नाहीत. ग्रामीण भागाला चालना देणाऱ्या जिल्हा परिषदेचे पैसे सुद्धा यात अडकले. सोसायट्या, संस्था अडकल्या. न्यायालयाने सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा केली. 11 वर्षे ते निवडणूक लढू शकत नाहीत. सहकार कायद्यांतर्गत 1444 कोटी रुपयांची वसुली झाली पाहिजे. व्याजासकट पैसे पिडीत शेतकरी व खातेदारांना मिळाले पाहिजे. सहकारमंत्री श्री दिलीप वळसे पाटील वसुली करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत कारण त्यांचे केदारांशी हितसंबंध आहेत. उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी यात लक्ष घालून पीडितांना न्याय देण्याची गरज आहे.
परंतु, वळसे पाटील हे अजितदादांचे ऐकत नसून शरद पवारांचे ऐकत आहेत. वळसे पाटील यांनी सावनेरमध्ये यावे. तांत्रिक अडचणी दूर करून त्यांनी केदारांकडून वसुली सुरु करावी. या वसुलीच्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही. सुनील केदार यांना जनतेने गावबंदी करावी, त्यांना पैश्याबद्दल विचारणा करावी. जनतेने सावनेर विधानसभा क्षेत्रात भ्रष्टाचारी आमदार बदलून परिवर्तन करावे. कारण त्यांनी लोकांचे भविष्य खराब केले, दोन पिढ्या गारद केल्या. आम्ही शांत बसणार नाही. ठिय्या आंदोलन आणि त्यानंतर आमरण उपोषण तसेच संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ‘वसुली यात्रा’ काढल्याशिवाय राहणार नाही. सुनील केदार यांच्याकडून 1444 कोटींची वसुली करून ते 2 महिन्यात पिडीत शेतकरी, नोकरदार व खातेदारांच्या खात्यात पैसे जमा करा, ही आमची मागणी आहे. ही वरपर्यंत न्यावी, अशी मागणी मी चंद्रशेखर बावनकुळे यांना करतो.