औरंगाबाद, 04 नोव्हेंबर 2022 ः
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरी, ज्वारी आणि गव्हाच्या दरात भाव वाढ झाली आहे. क्विंटल मागे बाजरी, ज्वारी व गव्हाच्या दरात 200 ते 350 रुपयांची भाव वाढ झालेली आहे. बाजरीला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतातील 50 टक्के बाजरी खराब झाली आहे. त्यामुळे या भाववाढीमध्ये बाजरीचे भाव आणखीन वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या क्विंटल मागे बाजरीचे भाव 200 ते 250 रुपयांनी वाढले आहेत. सध्या 2600 ते 2850 रुपये दराने बाजरी विक्री सुरू आहे. हिवाळा सुरू झाला आहे थंडी वाढल्यानंतर बाजरीला आणखी मागणी वाढेल परिणामी भावामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. ज्वारीच्या भावात एक क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या 3000 ते 4000 रुपये क्विंटल दराने ज्वारी विकत आहे.
भारतातील गव्हाला विदेशात मोठी मागणी आहे. एप्रिल ऑगस्ट दरम्यान 43.5 लाख टन गव्हाची निर्यात झाली. मागील वर्षी याच अवधीत 20.07 टन निर्यात झाला होता. त्यानंतर केंद्र सरकारने गहू निर्यातीवर बंदी आणली होती. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये आठ देशांत गहू निर्यात झाला. अजूनही गव्हाची निर्यात होत आहे. यामुळे गव्हाचे भाव वाढले आहेत, असं व्यापाऱ्यांनी सांगितले.