बारसवाडा येथे किड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत शेतीशाळा संपन्न.
अंबड 6 ऑगस्ट वडीगोद्री: बारसवाड सद्यपारिस्थितीत पिकांसाठी पाऊस समाधानकारक असल्याने सगळीकडे खरीप पिकांची वाढ जोमदार दिसत आहे तसेच पाऊसाने उघडीप दिल्याने शेतकरी फवारणी साठी लगबग करताना शिवारात दिसत आहेत, म्हणून मौजे बारसवाडा ता.अंबड येथे पिकांवरील किड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत कृषि विभाग,अंबड व इफको कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कृषि अधिकारी सचिन गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशील शेतकरी शरद कोंडीराम वाकडे यांच्या शेतामध्ये शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती…
यावेळी कृषि सहाय्यक गोवर्धन उंडे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि, सततचे ढगाळ वातावरण,अपुरा सूर्य प्रकाश, रिमझिम पाऊस यामुळे काही ठिकाणी सोयाबीन व कापूस पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तरी शेतकऱ्यांनी उपाययोजना म्हणून एकात्मिक किड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी प्रत्येकी 20 लावावेत,एक प्रकाश सापळा लावावा, नैसर्गिकरित्या किड नियंत्रणासाठी पक्षी थांबे एकरी 20 लावावेत आणि फवारणीसाठी वनस्पतीजन्य जैविक किडनाशक 5 टक्के निंबोळी अर्काचा वापर करावा तसेच गरज असेल तरच फ्लोनिकॅमिड 50 डब्लुजी टक्के 3 ग्रॅम किंवा बुफ्रोफेझिन 25 टक्के एस सी 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावी असे आवाहन त्यांनी केले….
कृषि सहाय्यक अशोक सव्वाशे म्हणाले कि,सद्यस्थितीत कापूस पाते ते फुलोरा अवस्थेत आहे याच वेळी कापूस पिकामध्ये गुलाबी बोन्डअळीची डोमकळी दिसून येते अश्या प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या व पाते जमा करून नष्ट कराव्यात.तसेच गुलाबी बोन्डअळीसाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत आणि सलग तीन दिवस तीन रात्री प्रति सापळा 8 ते 10 पतंग सापळ्यात आढळून आले कि आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे असे समजून कृषि विद्यापीठ शिफारशीत किटकनाशकांची फवारणी करावी असे सांगितले…
तसेच इफको कंपनी जालना जिल्हा व्यवस्थापक श्री.राहुल भुजाडे नॅनो खतांविषयी माहिती देताना म्हणाले कि नॅनो युरिया व नॅनो डीएपीच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते, खर्चात बचत होते आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ होते तसेच नॅनो खते जैव सुरक्षित, आणि पर्यावरणास अनुकूल, विषमुक्त, शाश्वत शेतीसाठी योग्य असून वाहतूक व साठवणूकसाठी सोपे व किफायतशीर आहे असे त्यांनी सांगितले…
यावेळी उपस्थित शेतकरी यांना गावचे सरपंच रामेश्वर खंडागळे यांच्या हस्ते नॅनो युरिया व नॅनो डिएपी चे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषि सहाय्यक संकेत डावरे यांनी केले, तर सदरील शेतीशाळेला कृषि सेवक चंद्रकांत मुदिराज, तुषार शितोळे सह बारसवाडा व दोदडगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते…