वाळूजमहानगर (तरुण भारत प्रतिनिधी) एमआयडीसीला जोडणारा तिसगाव वडगांव रोडवर काही दिवसांपूर्वीच गतिरोधक बसविण्यात आले होते परंतु हे गतिरोधक निखळून पडले असून रस्ता मोकळा झाला आहे. सिग्नल व गतिरोधकांअभावी या रस्त्यावरून वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांत वाढ झाली आहे. हा रस्ता नुकताच गुळगुळीत करण्यात आला असून हा मार्ग सरळ एमआयडीसीला जोडत असल्याने या रस्त्यावरून नेहमीच कामगार, विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ असते.
हा रस्ता पुढे समृद्धी महामार्गला जोडत जातो. लिंक रोड झाल्यापासून या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे या मार्गावरील काही ठिकाणी पथदिवे गेल्या कित्येक दिवसापासून बंद असून रात्रीच्या वेळी या रस्त्यावर अंधार असतो. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, मोठ्या अपघाताची भीती वाढली आहे. दिवसाही येथून वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याच्या वाहनधारकांच्या तक्रारी आहेत.
गतिरोधक नसल्याने येथे वरचे वर अपघात होत असून, नागरिक अपघातात जखमी होत आहेत या रस्त्यावर अपघातांचे प्रकार सुरूच असल्याने येथे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सिडको बचाव कृती समितीचे नागेश कुठारे यांनी केली आहे