पॅरिस, ८ ऑगस्ट (हिं.स.) : “आई, कुस्ती जिंकली मी हरले, तुझं स्वप्न आणि माझी हिंमत आता संपलीय, याहून अधिक लढण्याची ताकद माझ्यात उरली नाहीये, अलविदा कुस्ती २००१-२०२४. मी नेहमीच तुमच्या सर्वांची ऋणी राहीन, माफी”, अशी भावनिक पोस्ट भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करून कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली आहे.
मंगळवारी विनेशनं महिलांच्या ५० किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात क्युबाच्या युस्नेलिस लोपेझ गझमनवर मात केली होती. मात्र, बुधवारी सकाळी विनेशचं वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आलं. यामुळे संपूर्ण भारतालाच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तुला हरवण्यात आलंय! – कुस्तीपटू बजरंग पुनिया
विनेशच्या निवृत्तीवर प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनियाने प्रतिक्रिया दिली आहे. ‘तू हरलेली नाहीस, तुला हरवण्यात आलंय. आमच्यासाठी नेहमीच तू विजेता राहशील. भारताची बेटी असण्याबरोबरच तू भारताचा अभिमान आहेस.’
भारताचे राष्ट्रीय महिला प्रशिक्षक वीरेंदर दहिया म्हणाले, “प्रत्येकाला असं वाटतंय की, घरात कोणाचा मृत्यू झालायं. प्रत्येकाला धक्का बसलायं.”