जाफराबाद प्रतिनिधी
आनंदाने न्हाऊन निघालेला श्रावण महिना आणि त्याच श्रावणाच्या हलक्याशा सरींनी आनंदाने ओलीचिंब झालेली आमची न्यू हायस्कूलची मुले…..
बालकवींच्या
“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे”
या ओळींची आज आठवण आल्या वाचून राहिली नाही. आनंदाने भरलेल्या या श्रावण महिन्यात निसर्गही तेवढ्याच समरसतेने साथ देत आहे. त्या निसर्गाला जवळून पाहण्यासाठी आमच्या न्यू हायस्कूल वरुड घायवटची निसर्ग सहल पायी पायी ने थेट पोहोचली गोपी-सोनगिरी या गावच्या परिसरात असलेल्या परमपूज्य राघव गिरी महाराज यांनी स्थापन केलेल्या आश्रमा मागील हिरवाईने नटलेल्या वनामध्ये, जिकडे बघावे तिकडे अवघ्या निसर्ग टवटवीतपणात न्हाऊन निघालेला.
अशा मनमोहक वातावरणात….
खरंतर चार भिंतीच्या आत मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा खरे शिक्षण देणाऱ्या निसर्ग शाळेत विद्यार्थ्यांनी आज शिक्षणाचे अनेक धडे पूर्ण केले…..
जंगलातील विविध वनस्पती, त्यांचे मानवी जीवनातील महत्त्व, तळे, तळ्यात राहणारे जलजीव त्याचबरोबर पक्षी त्यांचा कानाला हवा हवासा वाटणारा आवाज. हे सगळं अनुभवत असतानाच. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले कलाविष्कार सादर केले. कोणी आनंदात गाणी गायली, तर कुणी आपल्या वर्गाचा ग्रुप तयार करून नृत्यांची सादरीकरण केले. यामध्ये सोबत असलेले शिक्षकही मागे राहिले नाही.
राहून राहून येणाऱ्या पावसाच्या हलक्याशा सरी…..
त्यातच ऊन पावसाचा खेळ….. यात सर्व विद्यार्थी ओले चिंब झाले त्यामुळे तर विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.
सहल एवढ्यावरच थांबली नाही, तर येताना परमपूज्य राघवगिरी महाराज यांच्या आश्रमात तेथील भक्तांनी विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या खिचडी प्रसादाचा यथेच्छ आस्वाद घेतला. शेवटी बाबांनी त्यांच्या सुंदर अशा आवाजामध्ये विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गीत त्याचबरोबर ‘ए मेरे वतन के लोगो’ आणि एक गवळण म्हणून दाखविली विद्यार्थ्यांना जीवनात कसे वागावे, कसे राहावे यावर आधारित थोडक्यात मार्गदर्शन केले, आणि या सुंदर अशा सहलीचा गोड समारोप झाला.
या सहलीच्या आयोजन नियोजनामध्ये आणि यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये प्रशालेचे मा. मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांनी मनापासून कार्य केले त्या सर्वांचे आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन…..!