गेल्या एका वर्षापासून भारतीय क्रिकेटमध्ये फक्त एकाच नावाची चर्चा आहे. जगभरातील गोलंदाज ज्या फलंदाजाला चेंडू टाकण्यास घाबरतात अशा खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव होय. मैदानावर चारही दिशांना चेंडू मारणाऱ्या सूर्याला मिस्टर ३६० असे नाव देण्यात आले आहे. सूर्यकुमार हा जगातील कोणत्याही मैदानावर चेंडू कोणत्याही ठिकाणी मारू शकतो. त्याची फलंदाजी पाहताना असे वाटते की सूर्या टेनिस बॉलने खेळत आहे. यामुळेच तो टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.
सूर्यकुमारने भारताकडून ४५ टी-२० सामन्यात ४६.४१च्या सरासरीने १ हजार ५४८ धावा केल्या आहेत. यात ३ शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० मधील स्टार असलेल्या सूर्याला वनडेमध्ये मात्र तशी धमाकेदार फलंदाजी करता आली नाही. वनडेमधील त्याची कामगिरीपाहून अशी चर्चा सुरू झाली आहे की, सूर्या फक्त टी-२०चा फलंदाज आहे.
टी-२० मध्ये ज्या विस्फोटक पद्धतीने सूर्य फलंदाजी करतो त्याच्या उटल वनडेमधील चित्र आहे. सूर्याची वनडेतील गेल्या १० डावात कामगिरी पाहिल्यावर चाहत्यांना धक्का बसेल. त्याने गेल्या १० डावात फक्त १६.८८च्या सरासरीने १५२ धावा केल्या आहेत. यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही, यात ३४ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
वनडेच्या तुलनेत सूर्यकुमारची टी-२० मधील आकडेवारी पाहिली तर त्याने टी-२० मध्ये गेल्या १० सामन्यात ८६.३३च्या सरासरीने ५१८ धावा केल्या आहेत. यात २ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. या सामन्यात त्याने २९ षटकार आणि ४७ चौकार मारलेत. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात सूर्याने २६ चेंडूत ३१ धावा केल्या. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. आता दुसऱ्या लढतीत त्याची बॅट किती तळपते हे पाहावे लागले.