तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : अक्कलकोटमधील प्रवीण गायकवाड हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात आयोजित करण्यात आलेली मराठा समाजाची बैठक गदारोळ, वादावादी आणि हाणामारीत रूपांतरित झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप झाले.
सोलापुरात झालेल्या या बैठकीला अक्कलकोटसह परिसरातील मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध, पुढील आंदोलनाची दिशा ठरवणे आणि समाजातील एकता राखणे, हे उद्दिष्ट समोर ठेवून बैठक बोलावण्यात आली होती.
यावेळी काही वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की, “आपण सर्वजण प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आलो आहोत, आपापसात भांडणे करून समाजाची प्रतिमा मलीन करू नका.” मात्र, या वादामुळे बैठकीचे मूळ उद्दिष्ट बाजूला राहिले आणि चर्चा गोंधळातच झाली.
मराठा समाजात गायकवाड हल्ल्याबाबत तीव्र संताप असताना एकत्र येऊन ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा होती. परंतु वादावादीमुळे समाजात फूट पडण्याची भीती काही ज्येष्ठांनी व्यक्त केली. आगामी काळात अशा बैठका अधिक शिस्तबद्ध आणि संयमी वातावरणात होणे आवश्यक असल्याचे मतही अनेकांनी मांडले.